बॉलिवूड सारख्या झगमत्या विश्वात नात्यांचा खेळ सुरूच असतो. क्षणात नाती जुळतात आणि तुटतातही. बॉलिवूडमधील जास्त काळ टिकलेलं आणि ते देखील अगदी गुण्यागोविंदानं संसार करुन दाखवणा-या जोडप्यांपैकी काजोल आणि अजय देवगन हे एक जोडपं आहे.
लग्नाच्या २० वर्षांनंतरही काजोल आणि अजय देवगन यांचं नातं अगदी घट्ट बांधलेलं आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं एका गोष्टीचा खुलासा केला आहे. काजोल आणि अजय यांच्या लग्नासाठी वडिलांची परवानगी नव्हती.
त्यांच्या संमतीशिवाय लग्न केल्याचं काजोलनं या मुलाखतीत म्हटलं आहे.
काजोल आणि अजय यांचा सुखी संसार सुरू आहे. नीसा आणि युग अशी त्यांची दोन मुलं आहेत. पालकांची जबाबदारी दोघंही उत्तमप्रकारे सांभाळतायत. दोघंही सिनेसृष्टीतही सक्रिय आहेत. असं असताना लग्नाबद्दल काजोलनं एक खुलासा केला असून त्याची चर्चा सुरू आहे.
काजोलचे वडिल शोमू मुखर्जी अवघ्या २४ व्या वर्षी लग्न करण्याच्या काजोलच्या निर्णयाविरोधात होते. त्यांना वाटत होतं की, काजोलनं आणखी काम करावं आणि मगच लग्नाचा निर्णय घ्यावा. पण काजोलची आई तनुजा यांचा काजोलच्या लग्न करण्याच्या निर्णयला पाठिंबा होता. असं काजोलनं सांगितलं आहे.
काजोल म्हणाली की, आईने तिला एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे नेहमी आपलं मन काय सांगतं ते ऐकावं. त्यानंतर मी अजयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाच. आणि २४ फेब्रुवारी १९९९मध्ये लग्न केलं.
काजोल आणि अजय यांचं लग्न झालं तेव्हा ब-याच लोकांचं असं मत होतं की त्यांचं नातं जास्त काळ टिकणार नाही कारण त्यांचे स्वभाव विरुद्ध आहेत. पण आज इतकी वर्षे होऊन गेल्यानंतरही त्यांचं नातं एखाद्या ताज्यातवान्या फुलाप्रमाणे आहे.
तर लोकं काय म्हणतात, आपल्या कोणत्या कृतीने समाजाला काय फरक पडतो याविषयी जास्त विचार केला तर नात्याला तुम्ही कधीच न्याय देऊ शकत नाही. हेच काजोल आणि अजयनं हेरलं आणि समाजातील चर्चांवर विचार करण्यापेक्षा नातं घट्ट करण्यावर अधिक भर दिला.