15 व्या वर्षीच झाली होती कोट्यवधी, परंतु चुकीच्या सर्जरीमुळं संपलं या अभिनेत्रीच करिअर; निर्मात्यांनी दिला चित्रपट देण्यास नकार

आयशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या आयशानं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं आहे. आज तिचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आज जरी आयशा चंदेरी दुनियेत कार्यरत नसली तरी कधीकाळी ती तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. मात्र यशाच्या शिखरावर असताना तिनं प्लास्टिक सर्जरी केली. अन् या सर्जरीमुळंच तिच्या करिअरला उतरती कळा लागली.आयशाचा जन्म 10 एप्रिल 1986 साली मुंबईतील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. तिचे वडिल मुंबईतील एक प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.

आयशाला लहानपणापासूनच बॉलिवूडचं प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळं तिनं शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. लक्षवेधी बाब म्हणजे आयशा केवळ १५ वर्षांची होती त्यावेळी एका जॅकेट तयार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी मॉडलिंग करण्याची ऑफर तिला मिळाली होती. अन् तिनं देखील ही ऑफर स्विकारली.

2001 साली या कामासाठी तिला तब्बल 3 कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं. वयाच्या 15 वर्षीच कोट्यवधींची मालकीण झाली म्हणून आयशा त्यावेळी चर्चेत होती. त्यानंतर तिनं अनेक प्रोडक्टसाठी मॉडलिंग केली. त्यानंतर 2004 साली तिला तार्झन द वंडर कार या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

त्यावेळी आयशा केवळ 19 वर्षांची होती. त्यानंतर तिनं सुपर, सलाम ऐ इश्क, होम डिलिव्हरी, शादी नंबर 1 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.विशेष म्हणजे आयशाचे चित्रपट तिकिटबारीवर फारशी कमाल करत नव्हते. मात्र तरी देखील तिला कोट्यवधींचं मानधन मिळत होतं. याच काळात आयशानं अधिक सुंदर दिसण्यासाठी नाकाची प्लास्टिक सर्जरी केली.

मात्र यामुळं तिचा चेहरा विचित्र दिसू लागला. त्यानंतर झालेली चूक सुधारण्यासाठी तिनं होटांची सर्जरी केली. त्यानंतर गालाची असं करतकरत तिनं एकामागून एक अनेक ब्यूटी सर्जरी केल्या मात्र प्रत्येक सर्जरीगणीक तिचं सौंदर्य कमी होत गेलं. परिणामी एक वेळ अशीही आली जेव्हा प्रेक्षक तिला चेटकीण म्हणून चिडवू लागले.

प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळं अखेर आयशाला चित्रपट मिळणं थांबलं. सध्या ती बॉलिवूड आणि मॉडलिंगपासून दूर आपल्या पतीसोबत दुबईमध्ये राहात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.